
ठाणे (17) : ठाणे जिल्हयामध्ये १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध विशेष अभियान (एल.सी.डी.सी.) राबविण्यात येत आहे. या मोहीमेमध्ये शहरी विभागात झोपडपट्टी व चाळ कार्यक्षेत्रात सर्वेक्षण घेण्यात येत असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत एकूण ७,२२,२४६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
जनतेला कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकंलागतेपासून दुर ठेवण्यासाठी भारत सरकारतर्फे कुष्ठरोग शोध अभियान दरवर्षी राबवण्यात येते. या अभियान कालावधीत घरोघरी एक पुरुष व एक महिला (आशा सेविका) यांचे पथक कुष्ठरोगाची तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आणि
वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या शोध अभियानामुळे कुष्ठरोग व कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना संपूर्ण औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. कुष्ठरोगावरील उपचार अत्यंत साधा आणि सोपा आहे. तसेच, औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), ठाणे यांनी स्पष्ट केले आहे.