काळ्या फिती लावून पत्रकारांनी केला निषेध ; कठोर कारवाईची केली मागणी
ठाणे : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या विरोधाची पहिली ठिणगी ठाण्यात पडली असून, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान पत्रकारांनी काळ्या फिती बांधून खा. संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून पाटील संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर पत्रकारांना ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होताच पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ल्याची भाषा करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धिक्कार केला. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
