दिपावलीच्या जल्लोषात व्यापाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
नौपाडा व्यापारी मंडळाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ लाख १ हजारांचा मदतीचा हात!
गोखले रोडवर शॉपिंग फेस्टिव्हलचा आ.केळकर यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे :
दिवाळीच्या झगमगाटात ठाण्यातील व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवला आहे. नौपाडा, गोखले रोडवर शॉपिंग फेस्टीव्हल निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई केली असून यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नौपाडा व्यापारी मंडळाच्या वतीने चार लाख एक हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी सुपूर्द केला आहे. आमदार संजय केळकर यांच्याकडे हा धनादेश प्रदान करून व्यापारी मंडळाने उत्सवाच्या आनंदासोबत सामाजिक दायित्वही जपले आहे.
नौपाडा व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित नौपाडा शॉपिंग फेस्टिव्हल २०२६ चा शुभारंभ शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी गोखले रोडवरील के. के. टेलिकॉमजवळ जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उत्साहात झाला. यानिमित्त संपूर्ण गोखले रोड आकर्षक विद्युत रोषणाईने सजला असून, यावेळी लहानग्यांना आकर्षित करणारे विविध वेशभूषेतील कार्टुन्सची चलचित्रे ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत होती. एकंदरीत दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.
ठाणेकरांच्या खरेदीचे प्रमुख केंद्र असलेल्या गोखले रोड परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने-चांदी आणि वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पसंती असते. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध सवलती आणि नव्या वस्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोन्या-चांदीच्या घडणावळीवर विशेष सूट तसेच अन्य खरेदीवरही आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
उत्सवाचा आनंद तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावा या भावनेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीचे विशेष महत्त्व आहे. बाजारपेठेतील व्यापार वृद्धीसोबतच दुष्काळाप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
