
ठाणेः दंत शल्यचिकित्सा क्षेत्रातील नामांकित डॉ उल्हास वाघ यांना नुकतेच दि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नेरुळ, नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय पातळीवरील विशेषतज्ञ परिषदेत इंडियन अँकेडमी ऑफ ओरल मेडिसिन अँन्ड रेडिओलॉजी या संस्थेद्वारा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. उल्हास वाघ गेली ४५ वर्षे अव्याहतपणे रुग्णसेवा देत आहेत. भिवंडी येथील लैंगिक व्यावसायिक महिलांसाठी त्यांनी ‘साथी प्रकल्प ‘यशस्वीपणे दहा वर्षे राबविला. ज्या योगे त्या उपेक्षित महिलांमधील गुप्तरोग तसेच एच आय.व्ही/एड्सचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करून त्यांना निरोगी जीवन प्रदान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची दखल युएनएफपीए, युएसफ, युनिसेफ, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांचे कार्य सदर महिलांचे सबलीकरण व त्यांच्या मुलांच्या
शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे. आपल्या देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे गेली 36 वर्षे डॉ. वाघ तंबाखू विरोधी मोहिम यशस्वीरित्या राबवीत आहेत.
आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक आपल्या सहकाऱ्यांसह घेऊन आदिवासी पाडे, वृद्धाश्रम, मतीमंद मुले, तसेच तळागळातील गरजू लोकांसाठी दंत वैदयकीय सेवा पुरवित आहेत. कोव्हीड काळात सुद्धा एकही दिवस विश्रांती न घेता गरजू रुग्णांना अथकरित्या सेवा दिली आहे. डॉ उल्हास वाघ यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘जीवन गौरव पुरस्कार ‘देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.