ठाणे :
ठाण्याच्या शिवाई नगर, उन्नती गार्डन मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य मालवणी महोत्सवात खवय्यांची चंगळ आहे. महोत्सवात विविध पारंपरिक, खाद्य आणि हस्तकला स्टॉल्सनी परिसर गजबजून गेला असून दररोज खवय्यांची झुंबड उडालेली दिसत आहे.
या मालवणी महोत्सवात अहिल्यानगर येथील पांढरी पुल परिसरातील सुप्रसिद्ध ‘आनंदवन भेळ’ या खाद्य पदार्थांच्या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टॉलवर ग्राहकांच्या फर्माईशीनुसार झटपट ताजी, चटपटीत भेळ तयार करून दिली जाते. भेळची कुरकुरीत चव अनुभवण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडालेली असते.
आनंदवन भेळचे संचालक आदिनाथ काळे यांनी याविषयी बोलताना, भेळ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया उलगडून सांगितली. नाशिकच्या कुरमुऱ्या समवेत कुरकुरीत तिखट शेव, बारीक चिरलेला कांदा, ताजे लिंबूरस, सुगंधी कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भाजलेले शेंगदाणे यांचा योग्य समतोल साधत भेळ तयार केली जाते. चवीचा प्रत्येक घास हा तोंडात पाणी आणणारा ठरत आहे.
स्टॉलवर ओली भेळ, सुकी भेळ आणि मटकी भेळ असे तीन प्रकार उपलब्ध असून प्रत्येक प्रकाराला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मटकी भेळीची चव रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.
“भेळ एकदा चाखली की पुन्हा पुन्हा याल,” असे आवाहन करत आनंदवन भेळचे आदिनाथ काळे आणि त्यांचे सहकारी खवय्यांना मालवणी महोत्सवाला अवश्य भेट देण्याचे आवाहन करतात.
