ठाणे :
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे, विशेषतः अमेरिका व इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ व पुरवठ्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची चिंता शेकापचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी व्यक्त केली आहे.याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ठाणे जिल्हाधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच संबंधित विभागाच्या प्रधान सचिव यांना निवेदन दिले आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, काही गॅस एजन्सींकडून वाढीव दर आकारले जाण्याची तसेच कृत्रिम तुटवडा किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाइप गॅस वापरणाऱ्या उच्चवर्गीय नागरिकांवर याचा परिणाम कमी प्रमाणात होत असला, तरी स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरवर अवलंबून असलेल्या सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गॅस एजन्सींवर कडक देखरेख ठेवावी, वाढीव दर आकारणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करावी तसेच सामान्य नागरिकांना वेळेवर आणि योग्य दरात गॅस सिलिंडर उपलब्ध होईल यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
