
ठाणे (12 Nov. 2025) : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५रोजी) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी ०५ जागा, अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी ०२ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १८ जागा आणि सर्वसाधारण (महिला) प्रर्वगातील ४१ जागांची सोडत काढण्यात आली.
प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त (निवडणूक) बाळू पिचड यांच्या उपस्थितीत महापालिका शाळेमधील विद्यार्थिनींच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी केले. ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ७मधील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थिनींच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२,६९८ इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे, महापालिकेच्या एकूण १३१ पैकी, अनुसूचित जातींसाठी ०९ जागा, अनुसूचित जमातींसाठी ०३ जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा आहेत. एकूण १३१ जागांपैकी महिलांसाठी ६६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी, अनुसूचित जातींच्या ०५ जागा, अनुसूचित जमातींच्या ०२ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील १८ जागा आणि सर्वसाधारण प्रर्वगातील ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
ठाणे महानगरपालिकेत एकूण ३३ प्रभाग आहेत. त्या पैकी, ३२ प्रभाग हे चार सदस्यीय असून ०१ प्रभाग तीन सदस्यीय आहे. या ३३ प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण १३१ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यातील महिला प्रवर्गाची आरक्षण सोडत आज महापालिकेच्या शाळेमधील मुलांच्या हस्ते काढण्यात आली. आता आरक्षण निश्चितीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यावरील हरकती आणि सूचना दाखल कण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, असे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
हरकत व सूचनांचा कालावधी
सोमवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर, सोमवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२५ ते सोमवार, दि. २४ नोव्हेंबर, २०२५ ( दुपारी ३.००वाजेपर्यंत) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे.
हरकती व सूचना महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित नऊ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन स्वरुपात व ठाणे महानगरपालिकेच्या इमेलवर पाठवण्यात आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केलेले

महिला आरक्षणाचा तपशील
अनुसुचित जाती (महिला) – ०५ जागा
प्रभाग क्रमांक – ३अ, ६अ, ७अ, २२अ, २४अ
अनुसुचित जमाती (महिला) – ०२ जागा
प्रभाग क्रमांक – २अ, ५अ
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १८ जागा
प्रभाग क्रमांक – १ब, ३ब, ६ब, ७ब, ८अ, ९ब, १०अ, १४अ, १५ब, १६ब, १७अ, १९अ, २४ब, २६अ, २८ब, २९अ, ३०ब, ३३ब
सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला) – ४१
प्रभाग क्रमांक – १क, २क, ४ब, ४क, ५क, ८ब, ९क, १०ब, ११ब, ११क, १२ब, १२क, १३ब, १३क, १४ब, १५क, १६क, १७ब, १८ब, १८क, १९ब, २०ब, २०क, २१ब, २१क, २२क, २३ब, २३क, २५ब, २५क, २६ब, २७ब, २७क, २८क, २९ब, ३०ब, ३१ब, ३१क, ३२ब, ३२क, ३३क
- तक्ता ०२
ठाणे महापालिका एकूण जागा – १३१
१. सर्वसाधारण खुला प्रवर्ग – ४३ जागा
२. सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला) – ४१ जागा
३. नागरिकांचा मागास प्रवर्ग – १७ जागा
४. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १८ जागा
५. अनुसुचित जाती – ०४ जागा
६. अनुसुचित जाती (महिला) – ०५ जागा
७. अनुसुचित जमाती – ०१ जागा
८. अनुसुचित जमाती (महिला) – ०२ जागा