
ठाणे (12) : गायमुख घाटाचे पुनर्पुष्ठीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी २०२६मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस, महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पाण्ड्ये, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते.
घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले. त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली. गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुर्नपुष्ठीकरणाचे काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे. त्याचवेळी, जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी, पुर्नपुष्ठीकरणा एकाचवेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
त्याचबरोबर, गायमुख घाटाच्या पुर्नपुष्ठीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत, ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर, माजीवाडा, लोढा व समता नगर येथील समाज मंदिरे, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण व कांदळवन उद्यान, उपवन येथील धर्मवीर आनंद दिघे जिमखाना, तरण तलाव, स्मशानभूमी, विहीरी, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, अप्पासाहेब धर्माधिकारी भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आनंद नगर, कासारवडवली उद्यान, भाईंदर पाडा येथील कान्होजी आंग्रे उद्यान यांचे सुशोभीकरण, आनंदीबाई जोशी हॉस्पिटल, मराठा भवन, महिला हॉस्टेल, सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण इमारत, सुधाकर चव्हाण बहुउद्देशीय इमारत, शिवाई नगर, नाले बांधणीची कामे, जॉगिंग ट्रॅक, कासारवडवली येथील मार्केट, राम मंदीर तलाव सुशोभीकरण, लता मंगेशकर संगीत विद्यालय, वर्तकनगर, आनंदनगर स्पोर्टस कॉम्प्लेक्स व फुटबॉल टर्फ, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालय, कासारवडवली आदी प्रकल्पांचा आढावा परिवहन मंत्री यांनी घेतला.