“कवितांमध्ये समाज बदलण्याची ताकद”! — प्रशांत मडपूवार
“कविता केवळ भावना व्यक्त करत नाहीत, तर समाजाला दिशा
देण्याची आणि परिवर्तन घडवण्याची ताकद त्यांच्यात असते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व लेखक प्रशांत मडपूवार यांनी केले. शारदा प्रकाशन, तेजस्वी फाउंडेशन आणि प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मम हृदयी आशा’, ‘ऋतू बदलले तरी…’ आणि ‘काव्यक्षितीज’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्यात कवी प्रशांत मडपूवार , प्रा. प्रज्ञा पंडित, कवी विजय चव्हाण, कवी एकनाथ शेडगे, प्रकाशक डॉ संतोष राणे, प्रा रुपेश महाडिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशन सोहळा जोशी – बेडेकर कॉलेजमधील पाणिनी सभागृहात संपन्न झाला.
यावेळी कवी विजय चव्हाण लिखित ‘काव्यक्षितीज’ आणि कवी एकनाथ शेडगे लिखित ‘ऋतू बदलले तरी…’ या काव्यसंग्रहांसह आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आणि संगीत प्रवासावर आधारित ‘मम हृदयी आशा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. प्रज्ञा पंडित यांनी ‘मम हृदयी आशा’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आशा भोसले यांनी आपल्या गायनातून अनेक पिढ्यांना आनंद दिला आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन आणि कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्याच्या भावनेतून हे पुस्तक साकारण्यात आले आहे.
कवी एकनाथ शेडगे यांनी आपल्या ‘ऋतू बदलले तरी…’ या काव्यसंग्रहातील कवितांमधून जीवनातील बदल, नातेसंबंध आणि संवेदनशील भावविश्व व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तर कवी विजय चव्हाण यांनी ‘काव्यक्षितीज’ या संग्रहातील कविता वाचकांच्या मनातील विविध भावनांना स्पर्श करतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन मनिष पंडित यांनी केले.
ठाणे :
