ठाण्यात नवरंग फेस्टिवलची धूम
ठाणे :
दरवर्षीप्रमाणे यंदाही जोशी-बेडेकर महाविद्यालयात बहुप्रतिक्षित ‘नवरंग’ हा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देणारा, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व करणारा असा नवरंग हा केवळ उत्सव नसून एक सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यंदाच्या नवरंगच्या अध्यक्षा डॉ.मुग्धा केसकर यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य महोत्सव २४ डिसेंबर रंगणार आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या उत्सवासाठी मोठ्या उत्सुकतेने तयारी करत आहेत. 16 डिसेंबर पासून विविध डेज सुरु झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.यंदा नवरंग अंतर्गत खादी डे, साडी-टाय डे, मिसमॅच डे, जर्सी डे, सिनेमा डे, हूडी डे, ट्रॅडिशनल डे, ग्रुप अलाइक डे अशा विविध थीम डेजचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांच्या बाबतीतही विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे. वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, संगीत-नृत्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी, मेहेंदी, संगीत खुर्ची यांसोबतच नेल आर्ट, हेअर आर्ट, मोबाइल मानिया, ॲड मानिया, स्पार्क टँक अशा नाविन्यपूर्ण स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही मेहफिल व संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयातील सर्वांना सहभागी करून घेणारा हा उपक्रम अधिकच उल्लेखनीय ठरणार आहे.
यंदाच्या नवरंगची थीम ‘परिवर्तन’ अशी आहे. बदल, प्रगती आणि नवचेतना या मूल्यांना अधोरेखित करणारी ही थीम विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशादर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवरंगसारखे उत्सव विद्यार्थीजीवन समृद्ध करतात, त्यांच्या कलागुणांना वाव देतात आणि त्यांच्यातील सर्जनशीलता व आत्मविश्वास वृद्धिंगत करतात. यंदाचा नवरंगही विद्यार्थ्यांसाठी आनंद, ऊर्जा आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन येत आहे.
